- पिंपळे सौदागर येथे ‘मेस्टा’च्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ ऑक्टोबर २०२१) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील खासगी शिक्षण संस्थाचालकांना प्रशासकीय व खासगी स्तरावर भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. अनेक प्रश्न सोडविण्यात मेस्टाला यश आले आहे. शाळा चालवताना गंभीर प्रश्न उपस्थित होत असतात. शालेय शूल्क, शिक्षकांची नोकरी, विद्यार्थी प्रवेश, एनओसी आदींसाठी अडचणीतून मार्ग काढण्यासाठी संस्थाचालकांनी लढा उभा केला पाहिजे. शाळेचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन मेस्टाचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप काटे यांनी केले आहे.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या सभागृहात ही बैठक नुकतीच पार पडली. बैठकीत प्री-प्रायमरी स्कूल प्रामुख्याने सुरू करण्याची मागणी सर्वांनी केली. तसेच, एकाच शाळेत तीन-तीन वर्ष अनेक विद्यार्थी शिकत असतात. परंतु, मागील वर्षाचे शैक्षणिक शूल्क भरत नाहीत. प्रत्येक चालू वर्षाचे शूल्क वेळेत भरले जात नसल्यामुळे संस्थाचालक आर्थिक विवंचनेत पडतात. अशा परिस्थितीतून मार्ग काढणे अडचणीचे होते. त्या-त्या वर्षात विद्यार्थ्यांचे शालेय शूल्क भरून घेतल्यास संस्थेचे आर्थिक गणित बिघडणार नाही. याची खबरदारी घेतली पाहिजे. शिक्षक सुध्दा चालू शैक्षणिक वर्ष मध्येच सोडून निघून जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी शालेय शूल्क न भरता पुढील शिक्षणासाठी इतर शाळेत प्रवेश घेतो. अशावेळी पूर्वीच्या शाळेची फीस भरली जात नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेची एनओसी बंधनकारक करावी. जर शाळा सोडल्याची एनओसी असेल तरच त्याला शाळा व्यवस्थापकाने शाळेत प्रवेश द्यावा, अशा असंख्य प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली.
एकजुटीने काम केल्यास शासनाला दखल घ्यावी लागेल – काटे
संस्थाचालकांना शाळेसंदर्भात भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी एकजुटीची गरज आहे. एकजुटीने लढा दिल्यास सर्व प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश येणार आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मेस्टाच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा करुयात. तिव्र लढा उभारल्यास राज्य शासनाला सुध्दा दखल घ्यावी लागेल. त्यासाठी सर्वांनी मेस्टासोबत एकजुटीने काम करावे, असे आवाहन काटे यांनी केले आहे. बैठकीत अध्यक्ष संदीप काटे, कविता शर्मा, चक्रवर्ती मॅडम, पलक गांधी, सुषमा उदाध्याय आदी पदाधिकारी उपस्थित होते.