न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २३ जाने.) :- पिंपरी चिंचवड शहरात अनाधिकृत बांधकामांचा प्रश्न आ-वासून उभा राहिला आहे. शहरातील पूररेषा, वाढीव बांधकामे, रेडझोन व प्राधिकरण हद्दीतील बेकायदेशीरपणे बांधलेली लाखो अनाधिकृत बांधकामे नियमितीकरणास असंख्य अडचणी येत असतानाही, प्रशासन व सत्ताधारी भाजपचे नगरसेवक या बांधकामांना अभय देताना दिसत आहेत. तसेच बेकायदेशीर अनधिकृत बांधकामे उभारणीस प्रोत्साहन देत आहेत.
थेरगाव परिसरातील प्राधिकरण हद्दीतील किलबील शाळेजववळील गुरूनानक नगर येथे असाच काहीसा प्रकार घडला असून, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनाधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरु आहेत. याप्रकरणी शिवसेनेचे युवराज दाखले यांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, या परिसरात चालू असलेले अनधिकृत बांधकाम हातोडा मारून उध्वस्त करावे. तसेच या बेकायदेशीर बांधकामास जबाबदार व संबंधितांवर येत्या आठ दिवसात कायदेशीर करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने जन आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला आहे.











