न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाल्हेकरवाडी (दि. १९ जाने) :- वाल्हेकरवाडी परिसरात विविध ठिकाणी अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामे चालू आहेत. वाल्हेकरवाडी येथील भोंडवे वस्तीतील शिवतीर्थ कॉलनीत डांबरीकरणाचे काम सुरू होते. या कामासाठी डांबर हलक्या दर्जाचे वापरण्यात आल्याचा आरोप करून, स्थानिकांनी काम बंद पडले होते.
याची तक्रार देण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ठेकेदाराच्या पर्यवेक्षकाने अरेरावी केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ब प्रभागाच्या स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांना घेराव घातला.
त्यामुळे या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. स्थापत्य विभागाचे कनिष्ठ अभियंता उमेश मोने यांनी या रस्त्याच्या कामाची पाहणी करून, निकृष्ट काम बंद करून, पून्हा काम चालू करण्याच्या सूचना ठेकेदारास केल्या आहेत.











