- आयुक्तांकडून स्मार्ट सिटीचा अहवाल नगरविकास मंत्रालयाला सादर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ नोव्हेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिका स्मार्ट सिटी प्रकल्पाबाबत राज्य सरकारकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. नगरविकास मंत्रालयाने स्मार्ट सिटीच्या कामांबाबत महापालिकेला पत्र पाठवून विचारणा केली. त्यानुसार पालिकेने नगरविकास मंत्रालयाला नुकताच अहवाल पाठविला आहे.
शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांबाबत गेल्या चार महिन्यांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना, भाजपनेही राज्य सरकारकडे तक्रारी केल्या आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत झालेली रस्ते खोदाई, सुशोभीकरण कार्यक्रम, गार्डन, सीसीटीव्ही बसविणे या सर्वच कामांत पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमध्ये ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे.
भ्रष्टाचार झाल्याचे पत्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिले होते. महापालिकेत भाजपची सत्ता आहे. महापालिका सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीच्या २५० कोटींच्या विषयावरून सभा गाजली होती. स्मार्ट सिटीच्या ठेकेदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवत उपठेकेदार नेमले आहेत, असा आरोपही झाला होता. स्मार्ट सिटीबाबत तक्रारी होत असल्याने नगरविकास मंत्रालयाने याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पत्र पाठवून विचारणा केली होती. त्यानुसार पाटील यांनी स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अहवाल नगरविकास खात्याला पाठविला आहे.
पिंपरी – चिंचवड स्मार्ट सिटीबाबत नगरविकास मंत्रालयाला तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांनी महापालिकेकडे स्मार्ट सिटीच्या कामांचा अहवाल मागविला.
त्यानुसार नगरविकास मंत्रालयाला स्मार्ट सिटीच्या कामाबाबत अहवाल पाठविला आहे – राजेश पाटील, पालिका आयुक्त.