- पिंपळे गुरवमधील घटना; दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२१) :- एलआयसीची एलआयसी बॉण्ड चांगली योजना आहे. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करता का? तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला वर्षाला साडेनऊ टक्के पैसे मिळतील, अशी माहिती आरोपी महिलेने फिर्यादीला फोनद्वारे देऊन फोन कट केला. फोनवरील आरोपी महिला आणि एक महिला फिर्यादीच्या घरी काही दिवसांनी आल्या. त्यांनी एलआयसी बॉण्डबाबत माहिती दिली आणि फिर्यादीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले.
फिर्यादीने एक लाखांचा धनादेश आरोपी महिलांना दिला. फिर्यादीने आरोपींकडे पावतीसाठी पाठपुरावा केला. आरोपींनी फिर्यादीचा फोन टाळला. नंतर काही दिवसांनी पैसे भरल्याची पावती फिर्यादीला मिळाली. फिर्यादीने एलआयसी ऑफिसमध्ये जाऊन पडताळणी केली असता पावती बनावट निघाली. ही घटना १५ फेब्रुवारी ते २२ ऑक्टोबर २०२१ दरम्यान पिंपळे गुरव येथील सुदर्शननगर येथे घडली.
देविदास तुकाराम लोंढे (वय ४६, रा. पिंपळे गुरव) यांनी रविवारी (दि. ३१) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.












