न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- ‘वंचित बहुजन आघाडी’चे येत्या सोमवारी (दि.२८) रोजी पिंपरी येथे महाअधिवेशन होणार आहे. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष असुदोद्दीन ओवेसी यामध्ये मार्गदर्शन करणार आहे, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी बुधवार (दि. २३) रोजी पत्रकार परिषदेत दिली.
प्रकाश आंबेडकर आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. त्याअंतर्गत सोमवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता पिंपरी नेहरुनगर येथील एच. ए. ग्राऊंड येथे भव्य सभा आणि महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेला आंबेडकर, ओवेसी यांच्यासह आमदार इम्तियाज जलील, पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, आमदार बळीराम शिरसकर, माजी आमदार विजय मोरे, माजी आमदार हरिदास भदे उपस्थित राहणार आहे. या सभेला राज्यभरातून विशेषत: पश्चिम महाराष्टातून २ लाख जनसमुदाय येणार आहे. त्यादृष्टीने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी बैठका सुरु आहेत.











