- तो प्रकार संबंधितांच्या जिवावर बेतणारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- पिंपरीगाव येथील वाघेरे कॉलनी क्रमांक ४ येथे काही नागरिकांना जहाल विषारी असणारा कोब्रा जातीचा नाग दिसून आला. हा नाग फणा काढत असल्याने लहान मुले, महिलांमध्ये भीती निर्माण झाली होती.
नाग आढळल्याबाबत सर्परक्षकांना माहिती देण्यात आली. त्यानुसार सर्परक्षक योगेश कांजवणे व राहुल वाघेरे हे तेथे दाखल झाले. त्यांनी नागाला सुरक्षितपणे पकडले. सर्परक्षकांनी त्याला पकडून निसर्गाच्या सान्निध्यात सोडले. दरम्यान, साप पकडण्याचे प्रशिक्षण न घेतलेल्या काही जणांनी या नागाला पकडण्याचा प्रयत्न केल्याचे सर्परक्षक कांजवणे यांच्या निदर्शनास आले.
हा प्रकार संबंधितांच्या जिवावर बेतणारा होता. साप पकडण्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे. विषारी आहे का, अशी माहिती असणे आवश्यक आहे, असे नसताना साप पकडण्याचे धाडस करू नये, असे आवाहन कांजवणे यांनी केले.
















