- अन्यथा स्वखर्चाने हटविण्याची परवानगी द्यावी..
- नगरसेविका ममता गायकवाड यांची आयुक्तांकडे हटके मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- वाकड, पिंपळे निलख याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्स, किऑक्स लावण्यात आले आहेत. त्यावरून अनधिकृत केबल टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप स्थायी समितीच्या माजी सभापती ममता गायकवाड यांनी केला आहे. हे अनधिकृत फ्लेक्स स्वखर्चाने काढण्याची परवानगी महापालिका प्रशासनाने द्यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत ममता गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाकड, पिंपळे निलख याठिकाणी अनधिकृत फ्लेक्सचे पेव फुटले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा येत आहे. तसेच अनेकवेळा याठिकाणी अपघात झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी हे अनधिकृत फलक काढण्याची मागणी केली आहे.
महापालिकेकडून कारवाई करण्यात येते. मात्र कारवाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे रस्ते पुन्हा अनधिकृत फ्लेक्स व किऑक्सने उजळतात. त्यानंतर यावर कारवाई करण्यासाठी पुन्हा पाच ते सहा महिने वाट पाहावी लागते. नागरिकांच्या हितासाठी वाकड, पिंपळे निलखमधील पिंक सिटी रस्ता, काळेवाडी फाटा ते मानकर चौक रस्ता, छत्रपती चौक ते उत्कर्ष रस्ता, दत्त मंदिर रस्ता याठिकाणी रस्त्यावरील अनधिकृत फ्लेक्स व किऑक्स वैयक्तिकरित्या स्वखर्चाने काढण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेविका ममता गायकवाड यांनी केली आहे.
















