- एकाच दिवसात तीन लाखांवर दंडाची वसुली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या डंपर व मिक्सर व इतर अशा ३७२ वाहनांवर कारवाई केली. त्यात तीन लाखांवर दंड आकारण्यात आला आहे.
वाहनचालकांचे लायसन्स, वाहनाची कागदपत्रे यांची पाहणी केली जात आहे. तसेच नो पार्किंगमध्ये वाहन पार्क करणे, दादा, मामा असे लिहून नंबरप्लेटमध्ये बदल करणे, रिफ्लेक्टर सुस्थितीत नसणे असा वाहनांवर विशेष मोहिमेंतर्गत सोमवारी (दि. २०) ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांकडून शहरातील मुख्य रस्ते व चौकांत वाहतूक नियमन केले जात आहे. तसेच वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे दंड वसुलीदेखील होत आहे. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई – चलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाई होत आहे. वाहतुकीला लगाम बसावा म्हणून पिंपरी – चिंचवड पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांच्या बेशिस्त चालकांवर कारवाई केली जात आहे.
वाहनचालकांनी वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन अपघात टाळणे शक्य होणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे, तसेच वाहनांची तपासणी करून दंड वसुलीवर भर देण्यात येणार आहे.
– आनंद भोईटे – पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा पिंपरी – चिंचवड…
















