- हत्येचं कारण अस्पष्ट; वडिलांची पोलिसात धाव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. डिसेंबर २०२१) :- तळेगावमध्ये १७ वर्षीय मुलाच्या डोक्यात गोळी झाडून त्याची हत्या केल्याची घटना मध्यरात्री बाराच्या सुमारास घडली. दशांत अनिल परदेशी असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. दशांतचे वडील अनिल परदेशी यांनी याबाबत तळेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.
रात्री उशिरा दशांत हा दुचाकी घेऊन घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो घरीच आला नाही. त्यामुळं त्याचा शोध घरातील व्यक्ती आणि नातेवाईक घेत होते. दशांतचा शोध घेत असताना नॅशनल हेवी कंपनी येथे त्याचा मृतदेह आढळला.
त्याच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याचं दिसून आलं. हा हत्येचा प्रकार असल्याची माहिती तळेगाव पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी पिस्तुल अथवा दशांतचा मोबाईलही सापडलेला नाही. दशांतची हत्या का करण्यात आली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
















