न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०२१) :- बिजलीनगर येथील रेल विहार सोसायटी परिसरात गुरुवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास झुडपामध्ये अडकलेले जखमी अवस्थेतील घुबड हे सुरक्षारक्षक बबन खांदवे व फरजाना शेख यांना आढळले. त्यांनी तातडीने पक्षीप्रेमी व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांना कळविले.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अंकुश माने, जगदीश गडकर यांच्यासमवेत ते तिथे पोहचले. घुबडाच्या डाव्या पायाला इजा झाल्याकारणाने व एक पंख झुडपामध्ये अडकल्याने त्याला उडणे अशक्यप्राय झाले होते. तिथून व्यवस्थितपणे सुटका करून थोडेसे खाद्य व पाणी देऊन त्यास प्रथमोपचार देण्यात आले. तासाभराच्या अवधीनंतर चिंचवड येथे पवना नदीच्या किनारी सुखरूपपणे त्यास सोडण्यात आले. काही क्षणातच त्याने यशस्वीपणे उड्डाण केले.
या संदर्भात पक्षीप्रेमी व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या २० वर्षांपासून बिजलीनगर रेल विहार वसाहतमधील उंच प्रवेशद्वारातील कमानीमध्ये घव्हाणी घुबडांच्या कुटुंबांचे वास्तव्य आहे. रात्रीच्या सुमारास हमखास त्यांचे दर्शन होत असते. आजूबाजूला असणारी झाडी व सुरक्षित निवासस्थान यामुळे त्यांचे अस्तित्व अनेक वर्षांपासून टिकून आहे. परिसरातील नागरिकांनाही त्यांची सवय झाली आहे. रात्रीच्या वेळेतील त्यांची उपस्थिती हमखास पहावयास मिळते. आतापर्यंत चार घव्हानी घुबडांना समितीच्या पक्षीप्रेमींमुळे जीवदान मिळाले आहे.”















