- पार्थ पवारांवरून महासभेत रणकंदन..
- कर्नाटक घटनेचा निषेध नोंदविण्यासही सत्ताधारी होते संभ्रमात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०२१) :- महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी झाली. त्यात सताधारी भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील पार्थ पवार यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आयुक्त सुपारी घेऊन आले आहेत. कोणतेही पद नसताना आयुक्त पार्थ पवारांसोबत आयुक्तांच्या अँटिचेंबरमध्ये बैठका घेतात. मात्र नगरसेवकांना वेळ देत नाही, अशी टीका भाजपने केली. त्यावरून भाजप राष्ट्रवादीत जुंपली आहे.
महापालिकेची निवडणूक जवळ आली आहे. तसे महापालिका सर्वसाधारण सभेत आरोप – प्रत्यारोप गाजत आहेत. भाजपचे सागर अंगोळकर यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आयुक्त शहरात सत्ताधारी भाजपची जिरविण्यासाठी आले आहेत. भाजपची सुपारी घेऊन आयुक्त या ठिकाणी रुजू झाले आहेत. एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याने असे वागणे शोभत नाही. आम्ही आयुक्तांना भेटायला जातो, तेव्हा त्यांच्याकडे भेटायला वेळ नसतो; पण ज्या वेळेस पार्थ पवार भेटायला येतात त्या वेळेस तासनतास अँटिचेंबरमध्ये गप्पा मारत बसतात. पार्थ पवारांकडे कोणतेही पद नसताना आयुक्त त्यांना एवढा वेळ देतात; परंतु लोकप्रतिनिधी आमच्यासोबत भेटायला वेळ नसतो.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत कर्नाटक, बेंगळुरू येथे झालेल्या घटनेचे पडसाद उमटले. निषेध करायचा की नाही, यावरून भाजपमध्ये एकमत नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने भाजप, मनसेनी कोंडी केली. विरोधक आक्रमक झाल्याने महापौरांनी निषेधाचा ठराव मंजूर केला. सुरुवातीलाच संदीप वाघेरे यांनी महापौर, सभागृह नेत्यांना बेंगळुरूच्या घटनेचा निषेध करण्याची विनंती केली. ती फेटाळली. त्यानंतर शिवसेनेचे सचिन भोसले यांनी निषेध केला. त्यावर सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी जय भवानी, जय शिवाजी घोषणा दिल्या. गोंधळ वाढू लागल्याने ढाके यांनी घटनेचा निषेध केला. मात्र, विरोधक ठरावावर अड्डून होते.
जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा देत राजू बनसोडे, राहुल कलाटे, योगेश बहल, अजित गव्हाणे यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेतली. त्यावेळी जास्त गोंधळ होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षाचेही नगरसेवक महापौर दालनासमोर आले. गोंधळ जास्तच वाढत असल्याने महापौर उषा ढोरे यांनी निषेध केला.


















