- पालिकेकडून अनधिकृत बांधकामं नियमितीकरणासाठीच्या जाचक अटी शिथिल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने ३१ डिसेंबर २०२० पूर्वीचे अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज मागविले आहेत. त्यातील जाचक दोन अटी रद्द करण्याची उपसूचना स्थायी समितीने नुकतीच मंजूर केली आहे. जाचक अटी रद्द करण्याचा ठराव समितीने मंजूर केला आहे.
बांधकाम ३१ डिसेंबर २०२० पूर्वी बांधून पूर्ण झाल्याचा कर संकलन विभागाचा दाखला आणि जलनिस्सारण विभागाचा ड्रेनेज जोडणीचा दाखला घेण्यात येऊ नये. त्याऐवजी बांधकाम मालकाचे प्रतिज्ञापत्र व आर्किटेक्टचा दाखला घेण्यात यावा. बांधकामांची सन २०१९ -२० व चालू वर्षांची मिळकतकर भरल्याची पावती घेण्यात यावी.
मिळकतकराची नोंदणी झाली नसल्यास मिळकत कराची आकारणी करण्यासाठी करसंकलन विभागीय कार्यालयाकडे सादर केलेली पावती अर्जासोबत घेण्यास मान्यता देण्यात यावी. त्याप्रमाणे नव्याने परिपत्रक काढण्यात यावे, अशी उपसूचना समितीने मंजूर केली आहे. गुंठेवारीनुसार बांधकाम नियमित करणे सुलभ व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा फायदा अनेक नागरिकांना होणार आहे, असे अध्यक्ष लांडगे यांनी सांगितले.