- कर्मचारी गंभीर जखमी; अज्ञात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ डिसेंबर २०२१) :- चिंचवड येथील संभाजीनगर शिवाजी पार्क उद्यानात फिर्यादी कर्मचाऱ्याला रविवारी दुपारी तीनच्या सुमारास लहान मुले उद्यानातून पळताना दिसली. त्यांनी त्या लहान मुलांना ‘का पळता’, असे विचारले. ‘आमच्या मागे मोठी मुले लागली आहेत, ती आम्हाला मारतात’, असे लहान मुलांनी सांगितले.
लहान मुलांच्या मागून सहा जण पळत येताना फिर्यादीना दिसले. त्यामुळे फिर्यादी यांनी मुलांना ‘का मारता’, असे विचारले. याचा राग आल्याने एकाने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी बॅटने जोरात दोन वेळा मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच अन्य आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करून शिवीगाळ केली.
भाऊसाहेब दादा थोरात (वय ३३, रा. कोयनानगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोये तपास करीत आहेत.