- शहर वाहतूक पोलिसांकडून आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२१) :- शहरातील खासगी आस्थापना तसेच एमआयडीसीतील कारखान्यांनी त्यांच्याकडील कर्मचारी व कामगारांना हेल्मेटसक्ती करावी, अशी सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधितांनी स्वतः हेल्मेट खरेदी करावी किंवा त्यांच्या आस्थापनाने ते उपलब्ध करून द्यावे, असेही सुचविण्यात आले आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एमआयडीसी परिसरात काही ठिकाणी तसेच मुख्य चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत आहे. यात प्राणांतिक अपघाताच्या घटना घडत असून, अनेकांना जीव गमवावा लागत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी तसेच वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाई केली जात आहे. यात एमआयडीसीतील कर्मचारी व कामगारांची संख्या मोठी आहे. शहरातील आस्थापनांनी, त्यांच्याकडील कंपन्या व इतर व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एक पाऊल पुढे टाकावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यासाठी पोलिसांकडून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
महाविद्यालयांनीही अंमलबजावणी करावी…
शाळा, महाविद्यालयांच्या विद्यार्थी, शिक्षक तसेच इतर कर्मचारी यांनीही हेल्मेटचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनादेखील हेल्मेटसक्तीबाबत सूचित करण्यात आले आहे. या संस्था, खासगी आस्थापना, एमआयडीसीतील कंपन्यांच्या प्रतिनिधींची वाहतूक पोलिसांकडून बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतरही हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे
वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. कर्मचारी, कामगारांची सुरक्षा महत्त्वाची आहे. हेल्मेट वापर न करणाऱ्या कर्मचारी व कामगारांना कामाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये, असे आवाहन निगडी वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षकशाहीद पठाण यांनी संबंधित आस्थापनांना केले आहे.