- पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून नियम लागू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ जानेवारी २०२१) :- “ पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात उद्यापासून मास्क नसेल तर ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना थुंकला तर एक हजार रुपये दंड, अशी दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना. दोन्ही आयुक्त व अधीक्षकांना केलेल्या आहेत. त्यामुळे त्याचं तंतोतंत पालन करण्याची नितांत गरज आहे.” अशी माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याती करोना आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.
तसेच, “ दोन्ही लस जर कोणी घेतलेल्या नसतील, त्याला आता कुठेही प्रवेश मिळणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंट, शासकीय कार्यालयात कामांसाठी येणाऱ्यांनी देखील दोन्ही लस घेतलेल्याच पाहिजेत, तरच त्यांच्या कामात सहकार्य केलं जाईल” असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
याचबरोबर, “ मास्कच्या बाबत सगळ्यांनी याची नोंद घ्यावी की, वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क, दोन आवरणाचे किंवा सर्जिकल मास्क वापरण्याच्या ऐवजी थ्री प्लाय आणि लेयर सर्जिकल डबल मास्क किंवा N-95 मास्क प्रत्येकाने वापरले पाहिजेत. डॉक्टारांच मत असं आहे की टू प्लायच्या मास्कचा एवढा उपयोग होत नाही आणि काहीजण तर विविध डिझाईनचा वापरतात त्याचा तर काहीच उपयोग होत नाही, असं स्पष्टपणे सगळ्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे. त्यामुळे त्याची नोंद सर्व नागरिकांनी घ्यावी. केवळ म्हणायला म्हणून कसाही मास्क वापरून चालणार नाही.” अशी माहिती देखील उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.