- प्रती किलोमीटरसाठी तिकीट दर दहा रुपये…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दहा दिवसांत कामे पूर्ण करून त्यानंतर मेट्रो कधी सुरू होणार? याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
कासारवाडी, पिंपरी – चिंचवड महापालिका हद्दीत पीसीएमसी, संत तुकाराम नगर, भोसरी ( नाशिक फाटा ), फुगेवाडी, दापोडी ही मेट्रो स्टेशन आहेत. त्यातील संत तुकाराम नगर हे मेट्रो स्टेशन पूर्णपणे तयार झाले आहे, तर अन्य पाच स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही दिवसांत हे काम देखील पूर्ण होणार आहे.
डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, पीसीएमसी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो अगोदर धावेल. त्यानंतर स्वारगेटपर्यंत मेट्रो सुरू होईल. सध्या ही मेट्रो लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे. नक्की तारीख सांगू शकणार नाही. मात्र , १५ जानेवारीपर्यंत उर्वरित कामे आणि शेवटची एक तपासणी होईल, त्यांनतर मेट्रो धावण्यासाठी तयारअसेल. मात्र, मेट्रो कोणत्या दिवसापासून सुरू करायची याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकारने मिळून घ्यायचा आहे. त्यानंतर मेट्रो प्रत्यक्षात नागरिकांसाठी सुरू होईल.
दीक्षित म्हणाले, ” कोरोनामुळे अनेक दिवस निर्बंध होते. त्यामुळे मेट्रो धावण्यास विलंब झाला. मेट्रोच्या एका किलोमीटरसाठी तिकीट दर १० रुपये असणार आहे. पिंपरी – चिंचवड ते स्वारगेट तिकीट दर ५० रुपये असणार आहे. त्यानंतर जशा प्रकारे अंतर वाढेल, तेवढ्या प्रमाणात तिकीट दर कमी केले जाणार आहेत. सर्वसामान्यांच्या सेवेसाठी महिना पास सेवा उपलब्ध होणार आहे.