- राज्य निवडणूक आयोगाकडून १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जानेवारी २०२२) :- पिंपरी- चिंचवड महापालिकेला आता प्रभाग प्रारुप रचनेचा प्रस्ताव तयार करून सादर करण्यासाठी नऊ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे नवीन आदेश आयुक्तांना दिले आहेत.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण निश्चितीकरिता प्रगणक गटची (ब्लॉक) लोकसंख्या, भौगोलिक सीमा यांची कागदोपत्री सविस्तर माहिती समाविष्ट करुन हा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. तसेच, यासोबत महापालिका हद्दीतील लोकसंख्या, सदस्यसंख्या, प्रभागांची संख्या याचा तपशील दिला आहे. यासंदर्भात कोणतीही शंका असल्यास ७ जानेवारीपर्यंत आयोगाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
प्रभाग प्रारुप रचनेची कागदोपत्री माहिती ६ जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश २९ डिसेंबर रोजी देण्यात आले होते. आता त्यासाठी मुदतवाढ दिली आहे. प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव १५ जानेवारीपर्यंत सादर करावा, असे नवीन आदेश राज्य निवडणूक आयोगाचे प्रभारी सचिव अविनाश सणस यांनी दिले आहे. महापालिका प्रशासनाने आराखडा तयार करुन ६ डिसेंबर रोजी आयोगाला पेन ड्राइव्हमध्ये सादर केला. त्यावर ११ डिसेंबर रोजी आयोगासमोर सादरीकरण झाले. त्यात आयोगाने काही दुरुस्त्या सुचविल्या होत्या.