- सत्ताधाऱ्यांच्या ‘भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी-चिंचवड’च्या घोषणा हवेतच विरल्या – वैभव थोरात..
- चिंचवड विधानसभेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२२) :- आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार असल्याची शक्यता आहे. आपल्याला एकट्यानं लढण्याची सवय आहे. शिवसैनिकांनी आघाडी होण्याची वाट न बघता जोमाने तयारीला लागावे. पक्षाला जास्तीत जास्त जागा निवडून आणावयाच्या आहेत. त्यासाठी प्रत्येकाने मनापासून काम करावे, असे आवाहन मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केले.
चिंचवड विधानसभेच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहर शिवसेनेच्या वतीने शुक्रवारी (दि. २८) रोजी चिंचवड येथील आनंदीबाई डोके सभागृहात नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी खा. बारणे बोलत होते. याप्रसंगी खा. श्रीरंग बारणे, पिंपरी-चिंचवड विधानसभेचे संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात, शहर प्रमुख अॅड. सचिन भोसले, शहर संघटिका अॅड. उर्मिला काळभोर, नगरसेवक राहुल कलाटे, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, पिंपरी विधानसभेचे राजेश वाबळे, चिंचवड विधानसभेच्या अनिता तूतारे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे, शहर संघटक संतोष सौंदणकर, माऊली जगताप, हरीश नखाते, नवनाथ तरस, विजय साने, नाना सोनार तसेच मतदार संघातील पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार बोकाळला आहे. नागरिक सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला वैतागले आहेत. त्यामुळे परिवर्तन अटळ आहे. पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा. महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर झालाच पाहिजे. त्यासाठी तयारीला लागा. सर्वांना बळ दिले जात आहे. भविष्यकाळ शिवसेनेचा आहे.
संपर्कप्रमुख तथा सिनेट सदस्य अॅड. वैभव थोरात म्हणाले, आपणा सर्वाना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार जनतेपर्यंत घेऊन जायचा आहे. मागील पाच वर्षापूर्वी सत्ताधाऱ्यांनी ‘भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त पिंपरी-चिंचवड’ अशा घोषणा दिल्या होत्या. पण या पाच वर्षात भ्रष्टाचाराचा अंत झालेला नाही. उलट हा राक्षस जास्त बोकाळला आहे. दररोज जनतेच्या पैशांची लुट केली जात आहे. पारदर्शी कारभाराचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेल्या या भाजपचा खरा चेहरा उघड करायचा आहे, त्यासाठी सर्वांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र या, सज्ज व्हा, असे आवाहनही त्यांनी केले.
शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले म्हणाले, शहरात शिवसेनेचे विचार, ध्येय-धोरणे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचविण्याचे काम सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, पर्यटनमंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील जनतेच्या हितासाठी, लोक कल्याणासाठी राबविलेल्या योजना तळागाळातील जनतेपर्यत पोचविण्याचे काम शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून केले. प्रभागातील बूथ बांधणी मजबूत करुन प्रत्येक बुथवर दहा शिवसैनिकांची टीम तयार करण्यात आली आहे. त्या माध्यमातून यंदाच्या पालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार आपल्याला काम करायचे आहे.
कार्यक्रमाचे संयोजन चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत को-हाळे यांनी केले. आभार संतोष सौंदणकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.