न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- कोरोनाबाधित रुग्णांसाठी अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालयात पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ठेकेदार संस्थेला अडीच महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी ४ कोटी ७२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्यामार्फत नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर क्रीडा संकुलातील जम्बो रुग्णालय टप्प्याटप्प्याने ८०० बेडसाठी सुरू करण्यात आले. मेडब्रोज हेल्थकेअर सेंटर यांना हे रुग्णालय चालविण्यास देण्यात आले होते, तर पायाभूत सुविधा उभारण्याचे काम जेस आयडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आले होते. त्यांच्यासमवेत वाटाघाटीत प्रतिमाह १ कोटी ६० लाख रुपये अधिक १८ टक्के जीएसटी असा एक महिन्यासाठी १ कोटी ८८ लाख रुपये खर्चानुसार त्यांना कामाचे आदेश देण्यात आले.
पहिल्या टप्प्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यानंतर १५ सप्टेंबर २०२१ पासून हे जम्बो रुग्णालय बंद करण्यात आले. परंतु, जेस आयडिया यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांनी १६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत या सुविधा पुरविल्या. त्यानंतर त्यांना १६ नोव्हेंबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत कामकाज आदेश देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने त्यांना अडीच महिने कालावधीसाठी ४ कोटी ७२ लाख रुपये एवढा खर्च होणार आहे.