न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री मंगलमूर्तीची माघी यात्रा रद्द केली आहे. मंगलमूर्तीच्या पालखीचे देव गाडीतून गुरुवारी मोरगावकडे प्रस्थान होणार आहे. मंगलमूर्तीची यात्रा कोविडच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्यापद्धतीने साजरी होणार आहे, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माघी यात्रा अत्यंत साधेपणाने साजरी केली जाणार आहे. यात्रेचे चिंचवडहून गुरुवारी दुपारी चार वाजता मोरगावकडे प्रस्थान होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यावर्षी माघी यात्रा ३ ते ८ फेब्रुवारी या काळात संपन्न होणार आहे.
यावर्षी माघी यात्रेचा कालावधी कमी करण्यात आला असून तो ६ दिवसांचाच राहील. कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता गेल्या काही महिन्यांत सर्व धार्मिक सण, उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने, लोकांनी एकत्र न येता साजरे केले आहेत. यात्रा ३ फेब्रुवारी रोजी मोरगावला जाणार आणि ८ फेब्रुवारीला देव गाडीतून परत येणार आहे.