- आरोपींकडून मृतदेहाची देखील विटंबना; चौघांना बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- भोसरीतील धावडे वस्ती येथे एका तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. संशय आल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांसोबत मिळून खून केल्याची कबुली दिली.
काटा काढण्याच्या उद्देशाने आरोपीने मयत तरुणाला २७ जानेवारी रोजी रात्री अकरा वाजता जनता गॅरेज जवळ बोलावून घेतले. तिथे त्यांचा एकमेकांसोबत वाद घातला. चौघांनी मिळून तरुणाला जमिनीवर पाडून त्याच्या डोक्यात दगड घालून डोके दगडाने ठेचून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तरुणाचा मृतदेह तब्बल ४० फूट फरफटत नेऊन गॅरेजमधील दोन गाड्यांच्या मध्ये फेकून दिला. २७ जानेवारीला ही घटना उघडकीस आली.
गणेश शिवाजी गडकर (रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी. मूळ रा. टाका, पो. औसा, ता. जि. लातूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. नामदेव शिवाजी शिंदे (वय २४, धावडे वस्ती, भोसरी. मूळ रा. याकतपुर, ता. औसा, जि. लातूर), भारत उर्फ बारक्या भीमराव आडे (वय २२, रा. धावडे वस्ती, भोसरी), आकाश अशोक सरदार (वय २४, रा. नाणेकरवाडी, चाकण), लक्ष्मण राजू नागोले (रा. धावडे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.