- सत्ताधारी भाजपकचे पालकमंत्री अजितदादांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष..
- राष्ट्रवादीचा भाजपवर आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- महापालिकेत विविध विकासप्रकल्पांच्या उद्घाटनात राजशिष्टाचाराचे पालन केले जात नसून पालकमंत्री अजित पवार यांना कळविले जात नाही, याबाबत महापौर उषा ढोरे आणि आयुक्त राजेश पाटील यांचा निषेध करीत आहोत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेतली. या वेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे उपस्थित होते.
संजोग वाघेरे म्हणाले, गेल्या महिनाभरापासून महापालिकेच्यावतीने विविध विकासकामांची उद्घाटने सुरू आहेत. त्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेतले जात नाही. तसेच पालकमंत्री अजित पवार यांचे नाव पत्रिकेत टाकले जाते. मात्र, त्यांना कळविले जात नाही. ही चुकीची बाब आहे.
विरोधी पक्षनेते मिसाळ म्हणाले, महापालिका उद्घाटनांमध्ये, विकासकामांत भाजपकडून राजकारण केले जात आहे. राजशिष्टाचाराचे पालन केले जात नाही.
प्रशांत शितोळे म्हणाले, राजशिष्टाचाराचे पालन महापौर करीत नाहीत. अशा कार्यक्रमांना आयुक्तांनीही परवानगी देऊ नये. दिल्यास यापुढे भूमिका घेतली जाईल. आयुक्तांनी राजशिष्टाचाराचे पालन होत नसेल तर कारवाई करावी. कार्यक्रम रद्द करावेत.