न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. महिनाभर ते उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल होते. अखेर त्यांची उपचारादरम्यान प्राण ज्योत मालवली.
निगडी स्मशानभूमी येथे उद्या गुरुवारी (दि. ३) रोजी सकाळी ११.०० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होतील. त्यांची अंतिम यात्रा वाकड येथील घरापासून निगडी स्मशानभूमीपर्यंत होणार आहे.
साताऱ्यापासून ते पिंपरी चिंचवड शहरापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. गजानन बाबर यांनी पिंपरी – चिंचवड येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन केली होती. २००९ साली शिवसेनेच्या तिकीटावर ते खासदार देखील झाले.
यानंतर त्यांनी २०१४ मध्ये शिवसेनेचे तिकिट न मिळाल्याने शिवसेना सोडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तिथे वाईट अनुभव आल्याने त्यानू पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांच्या अकाली जाण्याने शहरातील राजकीय पोकळी आणखी वाढली आहे.
शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेनेचे पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.