- कोविड डोस, मास्कचा वापर आस्थापनांवर बंधनकारक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज बुधवारी (दि. ०२) रोजी आदेश निर्गमित केले आहेत.
त्यानुसार राष्ट्रीय उद्याने तसेच सर्व पर्यटनस्थळे त्यांच्या नियोजित वेळेत सुरु राहतील. स्पा, सलून, ब्यूटी पार्लर आसन क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. अंत्यविधी तसेच अंत्यसंस्कारासाठी उपस्थित नागरिकांच्या संख्येस कोणतेही प्रकारचे निर्बंध नसतील. सर्व उद्याने सकाळी ०६.०० ते ०९.०० व सायंकाळी ०५.०० ते ०८.०० या वेळेत सुरु राहतील. मनोरंजन पार्क, थिम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क पन्नास टक्के क्षमतेने सुरु राहतील. रेस्टॉरेट, हॉटेल्स, सिनेमागृह व नाटयगृह आसन क्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने सुरु राहतील. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हॉल / मंडपाच्या आसन क्षमतेचा पन्नास टक्के क्षमतेने सुरु राहतील. विवाह सोहळा संपूर्ण खुल्या असलेल्या जागांच्या बाबतीत तेथील जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के लोकांना व बंदिस्त / बंद जागेत घेण्यात येणारा समारंभ २०० लोकांना यापैकी जे कमी असेल अशा सदस्य संख्येत साजरा करणेस परवानगी राहील. खेळांशी निगडीत सर्व स्पर्धा (घोड्यांच्या शर्यतीसह) स्टेडियम आसन क्षमतेच्या २५ टक्के क्षमतेने सुरु राहतील. शहरातील आठवडे बाजार सर्व दिवस सुरु राहतील.
सर्व नागरिकांचे लसीकरण (दोन मात्रा) पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील. मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन याबाबतच्या नियमांचे तसेच
शासनाच्या काविड १९ संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे व गर्दी नियंत्रित करणेची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहील. मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ ते ६०, तसेच भारतीय दंड संहितेचे कलम १८८ नुसार अन्य कायदेशीर तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहील.