- आर्थिक दंडासह फौजदारी गुन्ह्याची नोंद आणि परवाना रद्द होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात वैद्यकीय व्यवसाय करणारी रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब्स या आस्थापनांकडून उघड्यावर आणि कचराकुंडीत जैववैद्यकीय घनकचरा टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पालिकेचा आरोग्य विभाग त्यांना पंचवीस हजार रुपयांचा दंडा आकारत आहे.
मागील काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या जवळपास २५ घटना घडलेल्या आहेत. सामान्य कच-यामध्ये जैववैद्यकीय घनकचरा टाकणे हे अत्यंत घातक असून जैववैद्यकीय घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६ अंतर्गत शिक्षेस पात्र आहे. कचरा संकलन करणाऱ्या कर्मचा-यांच्या व नागरिकांच्या आरोग्यास देखील धोका संभावतो.
त्यामुळे अशा विघातक कृत्य करणा-या शहरातील रुग्णालये, दवाखाने, पॅथॉलॉजी यांच्याविरुध्द दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्ह्याची नोंद करून त्यांचा परवाना रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक प्रदूषण मंडळाकडे तक्रारी करणार आहे, असे पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.