- स्वतः व्यवसाय न करणाऱ्यांना पालिकेकडून गाळे वाटप?..
- व्यवसायीकांमध्ये तीव्र संताप; बाबा कांबळे यांची मध्यस्थी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२२) :- महानगरपालिकेच्या फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कृष्णानगर कस्तुरी मार्केटमधील टपरी-पथारी-हातगाडी धारकांना ओटे बांधून गाळे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. प्रत्यक्षात येथे व्यवसाय करणाऱ्यांना डावलून स्वतःचा व्यवसाय न करणाऱ्या नाहीत व ज्यांनी स्वतः परवाना काढून गाळे भाड्याने दिले आहेत, अशांनाच गाळे वाटप करण्यात येत आहेत.
यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय करणाऱ्या व्यवसायीकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. त्यांनी या ठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली. टपरी-पथारी-हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होत मध्यस्थी करीत फेरीवाल्यांना भेटून त्यांचे प्रश्न समजून घेतले. क्षेत्रीय अधिकारी भवरे यांच्यासोबत चर्चा करून गाळे वाटपाची प्रक्रियेला स्थगिती देऊन खऱ्या फेरीवाल्यांनाच गाळे वाटप करण्याची मागणी केली.
यावेळी छाया खुरंगळे, पूजा कांबळे, पल्लवी दाखले, रत्नमाला गौतम, कविता थोरात, सोनल फरकाटे, भाग्यश्री शेलार, सोना वाघिरे, वंदना पवार, सारिका जोगदंड, सीमा काळे आदी उपस्थित होते.












