- पिपळे निलखमध्ये टोळक्याची दहशत; एकाला मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल २०२२) :- ‘ आम्हाला खूनस देतो का ‘ , असे म्हणत जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून टोळक्याने एकाला दांडक्याने मारहाण करीत लुटले. तसेच ” आम्ही इथले भाई आहोत, कोणाची नडायची ताकद आहे का’, असे म्हणत परिसरात दहशत माजवली. ही घटना पिपळे निलख येथे घडली.
याप्रकरणी सोहम राहुल शिंदे (रा. क्रांतीनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुणाल सभाजी सातकर (वय २२), प्रसाद पांडुरंग पवार (वय २१), संकेत राजेंद्र मुरकुटे (वय २०), जीवन रमेश लोंढे (वय १८ सर्व रा. पिंपळे निलख) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी व फिर्यादी शिंदे यांच्यात जुनी भांडणे आहेत. या भांडणाच्या रागातून शनिवारी (दि २६) रात्री आरोपींनी फिर्यादी यांना आम्हाला खून्नस देतो का, असे म्हणत खाली पाडले. त्यांच्या छातीवर बसून हाताने व लाकडी दांडक्याने मारहाण केली. आरोपी प्रसाद याने सिमेटचा गर्दा फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तर आरोपी जीवन याने हाताने मारहाण करीत फिर्यादी यांच्या खिशातील दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला. फिर्यादी यांचा मित्र वैभव संजय दौरे (रा. पिंपळे निलख) यालाही आरोपींनी मारहाण केली. तसेच जमलेल्या लोकांकडे पाहून आम्ही इथले भाई आहोत, कोणाची नडायची ताकद आहे का, असे म्हणत परिसरात दहशत माजवली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.