न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ एप्रिल २०२२) :- भविष्य निर्वाह निधीच्या (पीएफ) तीन कार्यालयांना पिंपरी येथे हक्काची जागा मिळणार आहे. सध्या ही कार्यालये भाडेतत्त्वाच्या जागेत सुरू आहेत. हिंदुस्थान अॅण्टीबायोटिक्सच्या पिंपरी येथील एच. ए. मैदानातील साडेतीन एकर जागेत इमारत उभारून ही कार्यालये सुरू केली जाणार आहेत.
पीएफचे अप्पर केंद्रीय आयुक्त कार्यालय (पुणे), पीएफ क्षेत्रीय कार्यालय (पुणे १) आणि आकुर्डीतील पीएफचे क्षेत्रीय कार्यालय २) अशी तीन कार्यालये नव्या जागेत स्थलांतरित होणार आहे. ही सर्व कार्यालये एकाच ठिकाणी आणण्यासाठी एच.ए. कंपनीकडून साडेतीन एकर जागा घेण्यात आली आहे.
सध्या ही कार्यालये गेल्या २० ते २५ वर्षांपासून भाडेतत्त्वावरील जागेत कार्यरत आहेत. या कार्यालयांसाठी इमारत उभारणीच्या कामाला पुढील तीन ते चार महिन्यात सुरुवात होऊ शकते, अशी माहितीआकुर्डीतील पीएफ कार्यालयातून देण्यात आली. पीएफ कार्यालयांसाठी उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर ही कार्यालये स्वतःच्या जागेत सुरू होतील.