- मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश; द्विसदस्यीय समितीची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- महापालिकेच्या मोशीतील कचरा डेपो आगीची घटना संशयास्पद असल्याचा आरोप झाल्याने आयुक्तांनी चौकशीचे मंगळवारी आदेश दिले. डेपोला आग दुपारी लागली असताना अग्निशमन दलास चार तास उशिरा माहिती देण्यात आली. त्यामुळे संशयकल्लोळ वाढला आहे. आग नैसर्गिक की हेतुपरस्पर कोणी लावली का? कोणाच्या चुकीने आग लागली, याचाही शोध घेतला जाणार आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयुक्त राजेश पाटील यांनी द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे कचरा डेपो उभारला आहे. शहरातील घरोघरचा कचरासंकलन करून मोशीत साठवणूक आणि प्रक्रिया केली जाते. कचरा डेपोला ६ एप्रिल रोजी आग लागली होती. त्यानंतर १६ एप्रिलला पुन्हा बायोमायनिंगचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आग लागली. मोशीतील डेपोच्या आगीवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांमध्ये वाद जुंपला होता. दोघांनीही आगीस एकमेकांना जबाबदार धरले होते. त्यानंतर विरोधी पक्षासह काही सामाजिक संघटना व अखिल भारतीय मराठा महासंघाचे पिंपरी – चिंचवडचे युवक अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी चौकशीचे आदेश दिले
आग लागण्याचे कारण नैसर्गिक आहे की हेतुपुरस्सर. आग लावण्याचा मानवनिर्मित प्रयत्न होत आहे. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. आगीच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि शहर अभियंता राजन पाटील यांची द्विसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीने आपला चौकशीचा अहवाल ३० दिवसांच्या आत गोपनीय स्वरूपात सादर करावा, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.