न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२२) :- पिंपरी – चिंचवड शहरातील अनधिकृत नळजोड दंड आकारून नियमित केले जाणार आहेत. एका महिन्याच्या मुदतीमध्ये नळजोड अधिकृत करून न घेतल्यास महापालिकेच्या वतीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. या नव्या अभय योजनेला आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी शुक्रवारी (दि. २७) मंजुरी दिली.
पाणीपुरवठा विभागाने अनधिकृत नळजोड दंड भरून अधिकृत करण्याची अभय योजना जाहीर केली आहे. यानुसार १५ मिमी व्यासाचे निवासी नळजोड अधिकृत करण्यासाठी २ हजार रूपये अनामत रक्कम, ३ हजार रूपये दंड, ४ हजार ३०० रूपये पाणीपट्टी असे एकूण ९ हजार ३०० रूपये शुल्क आहे. तसेच, ३० जून २०१८ नंतरच्या नळजोडीसाठी दरमहा २०० रूपये अतिरिक्त शुल्क आहे. २० मिमी व्यासाच्या नळजोडसाठी १५ हजार ५०० रुपये, २५ मिमी व्यासासाठी २८ हजार ५५०, ४० मिमी व्यासासाठी ६७ हजार २०० आणि ५० मिमी व्यासाच्या नळजोडसाठी १ हजार १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. १५ मिमी व्यासाच्या वाणिज्य नळजोड अधिकृत करण्यासाठी एकूण २७ हजार ८०० रूपये शुल्क आहे. दरमहा १ हजार ५०० रुपये अतिरिक्त शुल्क आहे. तर, २० ते ५० मिमी व्यासाच्या नळजोडसाठी ४८ हजार ते २ लाख २८ हजार रूपये इतके शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी १५ जूनपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.
झोपडपट्टीतील अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी एकूण २०० रूपये आकारले जाणार आहे. त्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे. त्यासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, महापालिकेचे मिळकत बिल, वीज बिल, झोपडपट्टी पास आदी रहिवासी पुरावा आवश्यक आहे.