- प्रभागातील प्रलंबित कामे मार्गी लावण्याबाबत आयुक्तांना आर्जव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- गेल्या आर्थिक वर्षात सुरू करण्यात आलेली विकास कामे पूर्ण करण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी चिंचवड विधानसभा क्षेत्रातील भाजप नगरसेवकांनी केली आहे.
माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. १५) महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली. दोन महिन्यांपूर्वी भाजप नगरसेवकांची बैठक आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्यालयात पार पडली. या बैठकीत माजी महापौर माई ढोरे व माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी मार्गदर्शन केले होते. त्यावेळी महावितरणच्या बिलाची होळी करायची आणि विकास कामांचानिधी थांबविल्याबाबत आयुक्तांना सामूहिकरित्या जाब विचारायचा, असे ठरविण्यात आले होते.
बुधवारी माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली चिंचवड विधानसभा क्षेत्रातील २० नगरसेवकांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेत कामे पूर्ण करण्याची मागणी केली. मात्र नवीन कामे करण्यासाठी निधी नाही. तसेच राहिलेल्या कामापैकी तातडीची कामे हाती घेणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले. मात्र कोणती तातडीची कामे महापालिका करणार आहे, याची यादी आम्हाला द्यावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने आयुक्तांकडे केली आहे.


















