- उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून गुरुवार (दि. २३) रोजी शहरातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळचा पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे शहरातील सर्व भागांचा सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील विद्युत विषयक देखभाल दुरुस्तीची कामे, सेक्टर क्र. २३ निगडी येथील जलशुध्दीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा विषयक व पाणीपुरवठा विषयक नियमित देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे करणे व शहरातील पाणी वितरण व्यवस्थेतील दुरुस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे शहरातील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. २४) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही किंवा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.