- ”हा विजय पक्ष आणि आ. जगताप, आ. टिळक यांना समर्पित – उमा खापरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२२) :- विधान परिषदेच्या दहा जागांसाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातून भाजपच्या उमा खापरे विजयी झाल्या आहेत. त्यामुळे शहराला आता त्यांच्या रूपाने प्रथम महिला आमदार मिळाल्या आहेत. त्यामुळे शहरात भाजपचे आता तीन आमदार झाले आहेत. उमा खापरे यांना २७ मते पडली आहेत.
याबाबत बोलताना खापरे म्हणाल्या, ”माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पक्षाने एका छोट्या कार्यकर्तीला न्याय दिला आहे. हा विजय आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना समर्पित करते”.
राज्यातील नेत्यांना डावलून खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होती. थेट पंकजा मुंडे यांचे तिकीट कापून खापरे यांना संधी दिल्याचा आरोपही झाला होता.
खापरे या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक आणि जुन्या एकनिष्ठ भाजप पदाधिकारी आहेत. भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा आहेत. त्यापूर्वी त्या महिला मोर्च्याच्या प्रदेश सचिव होत्या. तर, त्याअगोदर त्या दोन टर्म पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेवक राहिलेल्या आहेत. २००१-०२ मध्ये पालिकेत त्या विरोधी पक्षनेत्या होत्या.