- अन्यथा मिळकतींवर १ जुलैपासून जप्तीची कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०२२) :- मिळकतकराचे संपूर्ण बिल येत्या गुरुवार (दि. ३०) पर्यंत एकरकमी भरल्यास सामान्यकरात सूट दिली जाणार आहे. त्यासाठी केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. मिळकतधारकांनी बिल भरून त्या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी शुक्रवारी (दि. २४) केले आहे. एक जुलैपासून थकबाकीदारांच्या मिळकती जप्तीची कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मिळकत महिलेच्या नावावर असल्यास त्यांना सामान्यकरामध्ये ५० टके सवलत आहे. दिव्यांगांना सामान्यकरामध्ये ५० टक्के सूट आहे. निवृत्त सैनिकांना मालमत्ताकरात १०० टके सवलत आहे. तसेच ऑनलाइन बिल भरल्यास अजून ५ टके सवलत देण्यात येते. पहिली सहामाही म्हणजे तीन जूनपर्यंत कर भरल्यास सामान्यकरात १० टके सूट देण्यात येते. पर्यावरणपुरक इमारतींना व पर्यावरणपुरक निवासी मालमत्तांना सूट दिली जाते. पर्यावरणपूरक मालमत्तांना १० टके, आगाऊ भरणा केल्यास १० टक्के तसेच ऑनलाइन भरणा केल्यास ५ टके असे एकूण २५ टक्कांपर्यंत सवलत आहे.
बिलासाठी दिलेले धनादेश वटले नाहीत. अशा नागरिकांनी रोखीने भरणा न केल्यास त्यांच्यावर नियम १३८ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जप्तीपूर्व नोटीसा दिलेल्या नागरिक व आस्थापनांनी बिलाचा भरणा केला नसल्यास त्या मिळकतींवर १ जुलैपासून जप्तीची कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा फोर्सचे जवान व क्षेत्रीय कार्यालयाचे पथक नियुक्त करण्यात आले आहे, असे देशमुख यांनी सांगितले.