- तळवडे रस्त्यावरील प्रकार; स्थापत्य विभागाचे दुर्लक्ष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- निगडी-तळवडे-चाकण रस्ता पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात जास्त वर्दळीचा रस्ता आहे. हजारो वाहनांची ये जा याच रस्त्यावरून दरोरोज होत असते. चाकण एमआयडीसी आणि तळवडे औदयोगिक वसाहतीला जोडणारा हा महत्वाचा रस्ता आहे. आठ दिवसापासून रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या चेंबरचे झाकण गायब झाल्यामुळे हे चेंबर अपघातास निमंत्रण देत आहे. आजपर्यंत दोन दुचाकींचा अपघात झाला आहे.
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे दक्ष कार्यकर्ते विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, तेजस सापरिया, नितीन मांडवे व समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन व रस्त्यावर ६ तास उभे राहून वाहनचालकांना सावधगिरी बाळगून वाहन चालवण्यास सांगितले. तसेच अक्सिस बँक एटीएम चौकात वाहतूक नियमन केले.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले, ” शहरातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या रस्त्यावरील गोल चेंबर उघडे असणे हे वाहनचालकांसाठी खूपच असुरक्षित व धोकादायक ठरत आहे. महापालिकेच्या स्थापत्य विभागाचे दुर्लक्ष अनेक दिवसांपासून असणे ही एक आश्चर्यकारक बाब ठरली आहे. एक चेंबर आठ दिवासापासून झाकणाची प्रतिक्षा करत आहे. नागरिकही अनेक दिवसांपासून ह्या रस्त्यावर धोका पत्करून वाहने चालवताना निदर्शनास येत आहे. पावसाळा सुरू झाला असून तातडीने चेंबर दुरुस्ती करून झाकण बसवणे आवश्यक आहे. पालिकेच्या स्थापत्य विभागाने सुस्तपणा झटकून या महत्वाच्या समस्येचे निवारण करणे क्रमप्राप्त ठरते.”