न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ जुलै २०२२) :- लोणावळ्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून नागरिकांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. गेल्या २४ तासात लोणावळा शहरात तब्बल १६६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी दहाच्या सुमारास भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर अवघ्या काही तासात नागरीकांची तिथे काही प्रमाणात गर्दी झाली आहे.
जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने जुलै महिना सुरू होताच जोरदार आगमन केले आहे. लोणावळ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमीच आहे. यावर्षी एकूण ५८१ मिमी पाऊस झाला आहे तर गेल्या वर्षी आजच्या दिवशी तब्बल १ हजार १०५ मिमी पाऊस झाला होता.
भुशी धरण, सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्यांमधून वाहणारे धबधबे हे अनुभवण्यासाठी, मक्याचं कणीस, भजी याचा आस्वाद घेण्यासाठी पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवडसह देशभरातून नागरिक लोणावळ्यात दाखल होत असतात. पावसाचा जोर वाढला असल्याने पर्यटकांचा ओघ लोणावळ्यात वाढला आहे. टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. यामुळं लोणावळा शहर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.