- माजी खा. आढळराव यांच्यानंतर विद्यमान खा. श्रीरंग बारणे शिंदे गटाच्या वाटेवर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जुलै २०२२) :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला गळती लागली आहे. या बंडखोरीनंतर आमदारांसह अनेक स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आहे. आता शिवसेनेचे १२ खासदारदेखील बंडखोरी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान आज सोमवारी (दि. १८) शिंदे गटाने आयोजित केलेल्या बैठकीत शिवसेनेच्या त्या १२ खासदारांमध्ये मावळ लोकसभेचे खा. श्रीरंग बारणे यांचाही समावेश होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. या बैठकीत जवळपास अर्धा तास चर्चा झाली. गटनेते पदासाठी राहुल शेवाळे आणि मुख्य प्रतोदपदासाठी भावना गवळी यांच्या नावाची चर्चा देखील झाल्याची माहिती समजत आहे. शिंदे गट सध्या नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज रात्री दिल्लीला रवाना होणार असल्याचंही समजत आहे. या घटनेबाबत अद्याप घोषणा होणं बाकी आहे. ती उद्या मंगळवारी होण्याची शक्यता जास्त आहे.
अद्याप तरी खासदार श्रीरंग बारणे नेमके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे गटाचे याचा सवाल अनुत्तरीत आहे. मध्यंतरी त्यांनी या प्रकरणावर पडदा टाकीत आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. मात्र, बैठकीस हजेरी लावल्याने खा. बारणे यांची भूमिकाच संशयास्पद ठरत असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
मातोश्रीसोबत उरले कोण?
१. गजानन कीर्तिकर – मुंबई उत्तर-पश्चिम २. संजय जाधव – परभणी ३. ओमराजे निंबाळकर – उस्मानाबाद ४. अरविंद सावंत – मुंबई दक्षिण ५. विनायक राऊत – रत्नागिरी सिंधुदुर्ग ६. राजन विचारे – ठाणे
मातोश्रीपासून दुरावले कोण?
१. श्रीकांत शिंदे – कल्याण २. राहुल शेवाळे – दक्षिण मध्य मुंबई ३. हेमंत पाटील – हिंगोली ४. प्रतापराव जाधव – बुलडाणा ५. कृपाल तुमाणे – रामटेक ६. भावना गवळी – यवतमाळ-वाशिम ७. श्रीरंग बारणे – मावळ ८. संजय मंडलिक – कोल्हापूर ९. धैर्यशील माने – हातकणंगले १०. सदाशिव लोखंडे – शिर्डी ११. हेमंत गोडसे – नाशिक १२. राजेंद्र गावित – पालघर…