- प्रत्येक महिन्याचा चौथा शनिवार करदात्यांसाठी राखीव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जनसंवाद सभेच्या धर्तीवर कर संवाद महिन्याच्या दर चौथ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता ऑनलाइन पद्धतीने आयोजित केला जाणार आहे. त्याची सुरुवात येत्या शनिवारी (दि. २३) होणार आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात ५ लाख ७७ हजार मिळकतींची नोंद महापालिकेकडे आहे. या सर्व मिळकतींवर पालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मिळकत कर गोळा केला जातो. मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी ऑनलाइन सुविधांसह विभागीय कार्यालयात कर भरण्याची सोय आहे. करदात्यांना घर बसल्या सेवा व सुविधा कशा उपलब्ध होतील, यासाठी आयुक्त राजेश पाटील आग्रही आहेत. त्यासाठी कर संकलन विभागप्रमुख सहाय्यक आयुक्त देशमुख प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने आता कर संवाद हा उपक्रम राबविणार आहे.
करदात्यांचे विविध प्रश्न, कर कशाप्रकारे लावला, चुकीची कर आकारणी केली आहे, मालमत्ता हस्तांतरण असे प्रश्न सोडविण्याचा हा प्रयत्न आहे. प्रत्येक महिन्यातील चौथ्या शनिवारी सकाळी अकरा वाजता फेसबुक, ट्विटर, यु ट्युब असा ऑनलाइन पद्धतीने हा कर संवाद होईल. यावेळी करदात्यांच्या प्रश्नांची सहाय्यक आयुक्त देशमुख यांच्यासह, प्रशासन अधिकारी तातडीने उत्तरे देतील.
ऑफलाइनची देखील सुविधा उपलब्ध…
ज्या नागरिकांना कर संवादमध्ये ऑनलाइन सहभागी होता येणार नाही, अशा नागरिकांचे कर आकारणी संदर्भात जे काही प्रश्न असतील त्यांनी पालिका भवनातील तळमजल्यावरील कर संकलन विभागाच्या कार्यालयात महिन्यातील चौथ्या शनिवारी व्यक्तीशः सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावे. यावेळी सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, सर्व मंडलाधिकारी, प्रशासन अधिकारी उपस्थित असणार आहेत. त्यामुळे नागरिकांच्या प्रश्नांचा निपटारा होण्यास मदत होणार आहे.