- लादलेली दरवाढ त्वरित मागे घ्या अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालयात अत्यल्प दरात आरोग्यसेवा उपचार सुरू आहेत. मात्र, आता पालिकेच्या सर्व रुग्णालयात नियमाप्रमाणे दरवाढ करण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील घेतला आहे. मात्र, या दरवाढीला शहरातील सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. तसेच आयुक्तांनी त्वरीत दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, इंदिरा कॉंग्रेस पक्ष, मनसे, वंचित बहुजन आघाडी सह आयटक, भाकप-माकप सहित कष्टकरी जनता आघाडी, अपना वतन संघटना, मानवाधिकार, शिवशाही व्यापारी महासंघ, मराठा क्रांती मोर्चा, छावा मराठा युवा महासंघ आदी संघटनांनी महापालिका आयुक्तांनी मोफत उपचार बंद करण्याच्या निर्णयाला आकुर्डी येथे जोरदार विरोध केला.
आकुर्डीतील श्रमशक्ती भवन येथे नागरी समस्या निवारण समितीचे निमंत्रक मारुती भापकर यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मनपा आयुक्तांनी दरवाढ मागे घ्यावी, असा ठराव बैठकीत मांडला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मानव कांबळे होते. बैठकीला अनिल रोहम, बाबा कांबळे, भाऊसाहेब अडागळे, देवेंद्र तायडे, धनाजी येळकर, गणेश दराडे, सचिन देसाई, गिरीश वाघमारे, सुदीप अडसूळ, धनंजय कांबळे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, महापालिकेची आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत असावी. शहरातील गोरगरीब, सामान्य नागरिक यांना मोफत उपचार देण्याचे धोरण सुरवातीपासून आहे. बदलता येणार नाही, आयुक्तांनी ही दरवाढ मागे घ्यावी.
काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम म्हणाले, यशवंतराव चव्हाण रुग्णालयासह सर्व रुग्णालये निर्माण करताना कामगार कष्टकरी वर्गाला मोफत उपचार देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. राज्य शासनाचे कोणतेही योगदान नसताना महापालिकेने शासन दराने दरवाढ करणे अतिशय चुकीचे आहे.