- अंतिम मतदार यादी संकेतस्थळावर, क्षेत्रीय कार्यालयात पाहता येणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जुलै २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची प्रभागनिहाय अंतिम यादी संदर्भातील कामकाज सोमवारी (दि. १८) पूर्ण झाले आहे. ती यादी संगणक प्रणालीत अपडेट केली आहे. उद्या गुरुवारी (दि. २१) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, असे सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या १ ते ४६ प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीवर विक्रमी ८ हजार १४७ हरकती पालिकेच्या निवडणूक विभागास प्राप्त झाल्या आहेत. मोठ्या संख्येने हरकती तसेच, जोरदार पावसामुळे कामकाजात अनेक अडचणी येत निर्माण झाल्या होता. त्या स्थितीत हरकतदारांच्या घरास प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी करून अर्जाची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, हरकतींवर काम पूर्ण करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी प्रथम १६ जुलै, त्यानंतर २१ जुलै अशी मुदतवाढ देण्यात आली होती.
चिंचवड व पिंपरी विधानसभा मतदार संघातील हरकतींचा निपटारा सुरुवातीला झाला. भोसरी विधानसभा मतदार संघातील प्रारूप मतदार यादीच्या हरकतींचे कामकाज पूर्ण झाले. राज्य निवडणूक आयोगाच्या संगणक प्रणालीवर प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी अपडेट केली आहे. गुरुवारी महापालिकेच्या संकेतस्थळावर तसेच, पालिका भवन आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयात अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल, असे खांडेकर यांनी स्पष्ट केले.