न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जुलै २०२२) :- मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज २२ जुलैला करण्यात आली. या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार ‘तान्हाजी : द अनसंग वॉरियर’ तर सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून अजय देवगणची घोषणा करण्यात आली.
याशिवाय मराठी विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.
चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. त्यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.














