- चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकरा वाजता कार्यक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्या शुक्रवारी (दि. २९) रोजी चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी अकरा वाजता नव्याने आरक्षण सोडत निघणार आहे. यात नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी सोडत निघणार आहे. आरक्षणाचे प्रारूप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लागू करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण महिलांचे आणि सर्वसाधारण प्रवर्गात काढण्यात आलेली यादी रद्दबातल ठरवण्यात आली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण सुरक्षित करून नवीन आरक्षण सोडत २९ जुलै रोजी काढण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासह होणार आहेत.
३० जूलैला आरक्षण सोडतीनंतर प्रभाग निहाय आरक्षणाचे प्रारुप प्रसिध्द करण्यात येणार आहे. तर ३० जूलै ते २ आॅगस्ट पर्यंत प्रभाग निहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात येईल. ५ आॅगस्टला आरक्षण निश्चित प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर विचार करुन प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शासन राजपत्रात प्रसिध्द केले जाणार आहे.