न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- थेरगाव येथील पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकॅडमीला भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि अकॅडमी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांनी नुकतीच भेट दिली.
खेळाडूंशी संवाद साधताना आणि मार्गदर्शन करताना ते म्हणाले, खेळाडूंनी पावसाळ्यातील सराव करीत असतानाच आगामी मोसमासाठी तंत्रकौशल्य विकसित करतानाच शारीरिक तंदुरुस्तीवर अधिक भर देण्याबाबत खेळाडूंसह प्रशिक्षकांनाही मौलिक मार्गदर्शन केले. येत्या मोसमात फलंदाजांनी मोठ्या धावसंख्या उभारण्याबरोबर गोलंदाजांनीही सर्वाधिक बळी घेऊन निवड समितीसमोर लक्षवेधी कामगिरी करणे आवश्यक आहे. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये आपले खेळाडू चमकदार कामगिरी करीत असल्याचे श्रेय अर्थात कठोर परिश्रम घेणाऱ्या प्रशिक्षकांना द्यायलाच हवे. अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीत प्रशिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. खेळाडूंनी कोणतीही समस्या असल्यास प्रशिक्षकांशी आणि माझ्याशी थेट संपर्क करून चर्चा करावी. पिंपरी चिंचवड महापालिकेचे विशेष आभार मानायला हवेत. कारण त्यांनी इनडोअर हॉल उपलब्ध करून दिल्यामुळे पावसाळ्यातही खेळाडूंना गुणवत्तापूर्ण सराव करण्याबरोबरच तंदुरुस्तीवरही भर देता येतो. परिणामी येथील खेळाडू राष्ट्रीय स्तरावर चमकतील ह्यात तिळमात्र शंका नाही.
यावेळी प्रशिक्षक मोहन जाधव, शादाब शेख, भूषण सुर्यवंशी, चंदन गंगावणे, चिंतामणी वैद्य, रणजीपटू श्रीकांत कल्याणी आणि फिटनेस एडवायझर डॉ. विजय पाटील उपस्थित होते.