- सहायक अभियंत्याकडे खंडणीची मागणी; आरोपी गजाआड…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जुलै २०२२) :- उगवता सूर्य पाहायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव, अशी धमकी देत चिंचवड एमआयडीसीमधील सहायक अभियंत्याला खंडणी मागणाऱ्या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. रोशन बबन कानगुडे (वय २२, रा. आंबीगाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
संतोष दत्तात्रय सुवर्णकार (वय ४६, रा. एमआयडीसी चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २१) रात्री एमआयडीसी ऑफिस, चिंचवड येथे घडली. फिर्यादी हे चिंचवड एमआयडीसी कार्यालयात सहायक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ते एमआयडीसी ऑफिसमध्ये काम करत असताना ९४०५४७०४७८ या क्रमांकावरून त्यांना रात्री नऊ वाजता फोन आला. उगवता सूर्य पाहायचा असेल ना, तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव. नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फुलस्टॉप लावून टाकतो, अशी धमकी दिली.
या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक करत होते. गुरुवारी (दि. २८) दुपारी तळेगाव एमआयडीसीमधील एका कंपनीच्या गेट समोरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून ३० हजार ५०० रुपये किमतीचे दोन मोबाइल फोन जप्त केले आहेत.