- प्रभागनिहाय आरक्षणांवर केवळ चारच हरकती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या २०२२ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणांवर चार हरकती महापालिका निवडणूक विभागाकडे आल्या आहेत. पालिकेच्या निवडणुक विभागाच्या वतीने हरकतींवर विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण ५ ऑगस्टला शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी दिली.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ४६ प्रभाग असून, नगरसेवक संख्या १३९ असणार आहे. आगामी निवडणुकीसाठी नुकतीच ओबीसी आणि महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये आजी – माजी अनेक मातब्बारांचे पत्ते कट झाले. त्यामुळे या आरक्षण सोडतीवर इच्छुक मोठ्या प्रमाणात हरकती व सूचना घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र दि. ३० जुलै ते दि. २ ऑगस्टपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दिला होता.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांच्या दोन आणि इतर दोन अशा चारच हरकती आल्या आहेत. वाकड प्रभाग क्रमांक ३८ मध्ये ‘ अ ‘ जागेवर अनुसूचित जाती (एसटी), ‘ ब ‘ जागेवर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) महिला आणि ‘ क ‘ जागेवर सर्वसाधारण (ओपन) महिला असे आरक्षण आहे. एकाच प्रभागात तीनही जागेवर आरक्षण टाकण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयूर कलाटे यांनी हरकत घेतली. नियमानुसार तीनपैकी अ आणि ब या दोन जागेवर आरक्षण असताना तिसरी जागा सर्वसाधारण खुली असावी. मात्र, प्रभाग ३८ मध्ये या नियमाचा भंग करण्यात आला आहे.
















