- पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतकवाद मिटवू शकत नाहीत….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रु.) :- देशातील महिला भगिनींचा अपमान करणारे, पाकिस्तान पुढे गुढघे टेकविणारे, छप्पन इंच छाती असल्याचा आव आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतकवाद मिटवू शकत नाहीत. त्यांना २०१९ च्या निवडणूकीत घरी बसविण्याचे काम देशातील महिलांनी करावे, असे आवाहन अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या राष्ट्रीय समन्वयक व महाराष्ट्र प्रभारी नूरी खान यांनी केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने महिला शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांनी प्राधिकरण निगडी येथे बैठक आयोजित केली होती. यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष सचिन साठे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संगीता तिवारी, निगार बारसकर, जयश्री पाटील, रेणूताई पाटील, रुपाली कापसे, महिला कॉग्रेसच्या माजी प्रदेश अध्यक्षा शामला सोनवणे, प्रदेश सचिव बिंदू तिवारी, शहर ब्लॉकच्या पदाधिकारी व महिला कार्यकारणी सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना यावेळी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. गिरीजा कुदळे यांनी शहर महिला कॉंग्रेसने केलेल्या कामाचा तपशिल, शक्ती प्रकल्प या विषयी माहिती व आगामी नियोजन यावेळी सादर केले. तसेच नूरी खान यांच्या हस्ते शक्ती प्रकल्प व सितारे प्रशिक्षण शिबिरात सहभागी झालेल्या प्रमाणपत्र देण्यात आले.
नूरी खान म्हणाल्या की, पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय प्रचारात दंग होते. ही लाजिरवाणी बाब आहे. गांधी कुटूंबियांच्या दोन पिढ्या दहशतवाद्यांच्या बळी ठरलेल्या असतानाही प्रियांका गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला. यावेळी भाजपाच्या लोकांनी महिला भगिनींचे अपमान करणारे वक्तव्य केले. देशातील महिलांचा अपमान करणा-या मोदींना व भाजपला कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशातील जनतेने २०१९ च्या निवडणूकीत पराभूत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी देशभर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सुष्मिता देव महिला संघटन व जन जागृती करीत आहे. या सरकारच्या काळात महागाई वाढली आहे, पंधरा लाखांच्या आश्वासनाचे काय झाले? पेट्रोल डिझेलचे भाव रोज वाढत आहेत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी वाढून युवक हवालदिल झाले आहेत. या नोटाबंदीतून काय साध्य झाले? असा प्रश्न देशातील जनता पंतप्रधानांना विचारत आहे.
या बैठकीच्या आयोजनात माजी नगरसेवक विद्या नवले, हुरबानो शेख, हिना गायकवाड, शोभा मिरजकर, संगिता कळसकर, नंदा तुळसे, अनिता अधिकारी, उषा खवळे, सायराबानु शेख, विनिता तिवारी आदींनी सहभाग घेतला.
स्वागत गिरीजा कुदळे, सुत्रसंचालन विनिता तिवारी आणि आभार विद्या नवले यांनी मानले











