- झोपडपट्टीत उभारलं होतं बनावट कॉल सेंटर; पोलिसांकडून पर्दाफाश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्त करण्यासाठी घरी नेऊन त्यातील मूळ पार्ट काढून घेत बनावट पार्ट बसवून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने मुंबई येथे सुरू केलेल्या कॉल सेंटरवर छापा मारून ही कारवाई करण्यात आली आहे.
अरुण गुलाब डुंबरे (वय ४३, रा. वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादींनी त्यांच्या घरातील व्हर्लपूल कंपनीचा खराब झालेल्या रेफ्रिजरेटरच्या दुरुस्तीकरिता इंटरनेटवर कस्टमर केअरचा नंबर शोधला. त्यातील एका लिंकवर क्लिक करून १८००१०३८४४१ यावर कॉल केला. समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने तो खरोखर व्हर्लपूल कंपनीतून बोलत असल्याचे भासवून दोघांना फिर्यादींच्या घरी पाठविले. त्या दोघांनी फिर्यादी यांचा रेफ्रिजरेटर दुरुस्त केल्याचा बनाव करून फिर्यादीकडून गुगल पेद्वारे तीन हजार २५० रुपये रक्कम घेऊन खोटे आणि बनावट इन्व्हाईस देऊन फसवणूक केली.
याप्रकरणी रफिक उर्फ रफीकउद्दीन अब्दुल ललित चौधरी (वय २८, रा. जाधववाडी चिखली), मोहम्मद फिरोज मो. अब्दुल (वय २१, रा. पवारवस्ती, दापोडी) या दोघांना पोलिसांनी सुरुवातीला अटक केली. त्यांच्याकडे चौकशी करून अशोक कुमार धुकाराम माली (वय ३१), जयप्रकाश धुकाराम माली (वय २७), पारस कुमार गौराराम माली (वय २१, तिघे, रा. मालाड ईस्ट, मुंबई. मूळ रा. राजस्थान) यांना अटक केली.
आरोपींनी विविध कंपन्यांच्या कस्टमर केअरच्या नावाने गुगलवर जाहिरात दिली आहे. त्यात दिलेल्या नंबरवर नागरिकांनी फोन केल्यास आरोपी नागरिकांसोबत कंपनीच्या अधिकृत कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचे भासवत. नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्या घरी टेक्निशियन पाठवत. हे टेक्निशियन ग्राहकांच्या घरी जाऊन त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमधून ओरिजिनल पार्ट बदलत. ते करता आले नाही तर दुरुस्तीच्या नावाखाली भलीमोठी रक्कम घेऊन जात. ग्राहकाची इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त न करता केवळ पैसे उकळण्यासाठी आरोपींनी हा गोरखधंदा चालवला होता.
मालाड मुंबईमधील पिंपरी पाडा झोपडपट्टीमध्ये सुरू असलेल्या २४ बाय ७ कस्टमर केअर सेंटरवर हिंजवडी पोलिसांनी छापा मारून कारवाई केली. त्यात कस्टमर केअरचा मालक आणि तिथे काम करणारे चार महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २४ मोबाइल फोन, नोंद वह्या, रजिस्टर, संगणक असा एकूण एक लाख १४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यातील सात मोबाइल क्रमांक हे टोल फ्री असल्याचे तपासात समोर आले आहे.