- नदीपात्रात बेकायदेशीर भराव अनं मैलामिश्रीत सांडपाणी सोडल्याची पालिकेकडून दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- काळेवाडी बीआरटी रस्ता येथील नदीपात्रात बेकायदेशीर भराव टाकला तसेच मैलामिश्रीत सांडपाणी सोडून नदीमधील जीवसृष्टीस व पर्यावरणास हानी पोहचवली. याप्रकरणी मे. खिलारी इन्फ्रा. प्रा. लिमिटेड या कंपनीकडून पालिकेने खुलासा मागतील आहे. पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी या कंपनीला नोटीस बजावली आहे.
पावसाळ्यापूर्वी नदीतील भराव काढून टाकण्याच्या सूचना वारंवार केल्या होत्या, तरी आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ही बाब अतिशय गंभीर असून आपल्यावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा ४ दिवसात करण्यात यावा. खुलासा वेळेत सादर न केल्यास किंवा दिलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास आपल्यावर निविदा अटी व शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच नदीतील भराव काढण्याकरिता कार्यवाही करण्यात यावी. कामाचा अहवाल या विभागास सादर करावा, असे या नोटीसीत म्हटले आहे.
काळेवाडी बीआरटी रोड येथील नदीपात्रात बेकायदेशीर भराव आणि मैलामिश्रीत सांडपाणी सोडून नदीतील जीवसृष्टीस व पर्यावरणास हानी पोहचवल्याप्रकरणी मे. खिलारी इन्फ्रा. प्रा. लिमिटेड या कंपनीवर कारवाईबाबत (दि. २८/०७/२०२२) पिंपरी चिचंवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे तक्रार केली होती. नदीत टाकलेल्या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाले. पावसाळ्यामध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच मैलामिश्रीत व रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीमधील जीवांना धोका पोहोचवून ते नष्ठ होण्याचा धोका निर्माण होतो, असे प्रशासनच्या निदर्शनास आणून दिले होते. पालिकेने या तक्रारीची दखल घेतली आहे.
– सिद्दिकभाई शेख – अध्यक्ष, अपना वतन संघटना…