न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ ऑगस्ट २०२२) :- महापालिकेच्या करसंकलन विभागाच्या ‘ माझी मिळकत, माझी आकारणी ‘ योजनेला अवघ्या चार महिन्यांत तब्बल ५०६ नवीन मिळकतींना मिळकतकर लागू झाला आहे. त्यामुळे दरवर्षी पालिकेच्या तिजोरीत मिळकतकरापोटी कोट्यवधी रुपयांचा भरणा वाढणार आहे. शहरात ५ लाख ७७ हजार मिळकतींची नोंदणी आहे.
कर संकलन विभागाने १ एप्रिल २०२२ पासून शहरातील मालमत्ताधारकांनी ‘ माझी मिळकत माझी आकारणी ‘ या योजनेद्वारे स्वंयस्फूर्तीने मालमत्ता कराची नोंदणी करणा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सवलतीची घोषणा केली. अशा मालमत्ताधारकांना सामान्यकरात ५ टक्के सवलत देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत चार महिन्यात तब्बल ६८५ मिळकतधारकांनी ऑनलाइन प्रक्रिया करून अर्ज केले. यामध्ये १९२ मालमत्ताधारकांना कर आकारणी सुरू झाली आहे. ५६ मालमत्ताधारकांनी कर आकारणी मान्य केली आहे. यामधील ११ जणांनी ऑनलाइन पध्दतीने २ लाख १६ हजार ४३५ रूपयांचा भरणा केला आहे.
यासंदर्भात सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले की, वरील योजनेअंतर्गत किवळे, चिखली, थेरगाव, पिंपर गाव, वाकड व मोशी या भागासह आदी भागातील हाऊसिंग सोसायटीमधील वैयक्तिक मालमत्तेच्या आकारणीसाठी एक किंवा दोन मालमत्ताधारकांनी अर्ज केले. एकूण २३ जणांनी केलेल्या अर्जामुळे नवीन ५०६ मालमत्तांची नोंदणी केली. त्या मालमत्ता कर कक्षेत आल्या आहेत. यामध्ये ४९२ निवासी, १२ बिगरनिवासी तर, २ औद्योगिक नवीन मालमत्ता आढळून आल्या आहेत. या योजनेअंतर्गत प्राप्त नवीन मालमत्ता आढळल्याने पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.